Monday, June 22, 2009

श्रावण भादवा


श्रावण भादवा धरा आली फुलारून
धरा आली फुलारून साज हिरवा लेवून

बरसती धारा धारा चुकून माकून
चुकून माकून मेघ गेले विस्कटून

भारावली केळ देह सुगंधात न्हाला
सुगंधात न्हाला रावा मनात हसला

ऊन पावसाचा खेळ अस्मानी रंगला
अस्मानी रंगला झाला आनंद मातीला

वारा धरी फेर वनी नाचे धुंद मोर
नाचे धुंद मोर निळ्या पिसांचा शृंगार

प्राजक्त फुलांचा सडा अंगणी पडला
अंगणी पडला झुला झुलत राहिला

श्रावण भादवा आला मनी बहरून
मनी बहरून नव्या आशा पालवून

श्रावण भादवा मना देई अलिंगन
देई अलिंगन जसा स्वप्नात साजण

No comments:

Post a Comment